मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केल्यावर देशभरात त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी तरुणांना स्वच्छता ठेवण्याची शिस्त लावणं सोपं काम नाहीय... त्यामुळे राज्याच्या एनएसएस विभागाने त्यावर चांगलाच उपाय शोधून काढलाय.
तुम्ही कॉलेज कॅम्पसमध्ये कचरा फेकता का? वर्गात कचरा टाकता का? तुमच्या कॉलेजचा कॅम्पस स्वच्छ ठेवता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ असतील, तर ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सिरीयसली घ्याव्या लागणार आहेत. कारण कॉलेज कॅम्पसमध्ये कचरा फेकणं किंवा कॅम्पस स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य न करणं यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. देशभरात सुरु झालेलं स्वच्छता अभियान आता विविध कॉलेजेसमध्येही राबवण्यात येतंय. याची जबाबदारी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच ‘एनएसएस’ युनिटला देण्यात आलीय. स्वच्छता अभियानाला सहकार्य करावं, असं आवाहन एनएसएसने केलंय. पण वर्गात किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये कचरा फेकणं सुरूच ठेवलं तर विद्यार्थ्यांना शिक्षा होणार आहे…
काय आहे ही शिक्षा...
- महिनाभर कॉलेज बंक करता येणार नाही.
- एक प्रोजेक्ट दहा वेळा लिहावं लागणार
- जो कचरा फेकतो त्याला स्वच्छता अभियानाची जबाबदारी दिली जाणार
- कँटीनमध्ये स्वच्छता अभियानाचा फलक घेवून उभं रहावं लागणार
- सलग एक आठवडा कॉलेजचं कॅम्पस साफ करावं लागणार
- दंडात्मक कारवाईसाठीही तयार रहावं लागेल
कॅम्पस आणि वर्गात कचरा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तर आहेतच शिवाय, एनएसएस विद्यार्थ्यांची एक टीमही तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. स्वाती देसाई यांनी दिलीय.
प्रत्येक कॉलेजमध्ये अशी शिक्षा देण्यात यावी की नाही याबाबत एनएसएस मुंबई विद्यापीठाशी चर्चा करणार आहे. पण स्वच्छतेच्या मुद्यावर शिक्षा होणार हे ऐकून विद्यार्थ्यांमध्ये आत्तापासूनच चर्चा सुरु झालीय. स्वच्छता अभियानाला तरुणांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पण कॉलेजमध्येच स्वच्छतेची शिस्त लागल्यास भविष्यात स्वच्छता अभियान राबवण्याची गरजच भासणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.