www.24taas.com, मुंबई
मुंबईमध्ये स्थानिक पक्षांचा उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असणारा राडा थंड होताच उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये ४० एकर जागा मागितली आहे. यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी विद्यापीठ स्थापन करायचं असून त्यासाठी ४० एकर जागेची मागणी उत्तर भारतीय संघाने राज्य सरकारकडे केली आहे.
उत्तर भारतीय संघाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे पूर्व येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उत्तर भारतीयांच्या विद्यापीठासाठी ४० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईमध्येच उत्तर भारतीयांसाठी सात मजली विश्रामगृह बांधण्यात येणार असून येत्या जानेवारीमध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे.
यापूर्वीही वांद्रे येथेच उत्तर भारतीय भवन, सभागृह, शाळा तसंच कॉलेज बांधण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह, खासदार संजय निरुपम, एकनाथ गायकवाड उपस्थित होते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार हे देखील हजर होते. भोजपुरी अभिनेते रवीकिशन आणि मनोज तिवारीही याप्रसंगी हजर होते.