www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.
इस्थर अनुह्या तरुणीच्या हत्या प्रकरणानंतर धडा घेतलेल्या पोलिसांनी `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` ही योजना सुरू केली आहे. मुंबई महानगर टेलिफोन निगम मर्यादितच्यासहयोगानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देतांना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितलं की, हा विशेष भ्रमणध्वनी क्रमांक आहे. ज्याचा एक स्वतंत्र सव्र्हर आहे. जेव्हा एखादी महिला कुठल्याही वाहनात बसेल तेव्हा त्या वाहनाचा क्रमांक या भ्रमणध्वनी क्रमांकावर `एमएमएस` नं पाठवायचा आहे. विशेष सॉफ्टवेअरमुळं ही महिला त्या वाहनात कुठून बसली, हे वाहन कुठं चाललंय, कुठं थांबलं त्याची सर्व माहिती देऊ शकणार आहे.
ही माहिती सर्व माहिती एक वर्षभर साठवून ठेवली जाणार असून एक कोटी क्रमांक साठविण्याची क्षमता यात आहे. वाहनचालकांनी त्यांच्या वाहनाचा क्रमांक दर्शनी भागात ठळकपणे लिहिणंही बंधनकारक करण्यात आलंय. मुंबईत सहा रेल्वे टर्मिनस असून टॅक्सी चालकांना यापुढं फलाटावर प्रवासी घेण्यासाठी जाता येणार नाही. तसंच वाहतूक पोलिसही इथं तैनात केले जाणार आहेत. गुन्हा घडण्यापूर्वी घेतलेली खबरदारी म्हणून अशाप्रकारची ही पहिलीच सेवा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.