खुशखबर… ‘बेस्ट’च्या विजेला ‘टाटा’चा पर्याय!

बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2014, 11:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता दक्षिण मुंबईतही टाटांची स्वस्त विज उपलब्ध होणार आहे. सुप्रीम कोर्टानं नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे हे शक्य झालंय. त्यामुळे, बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.
`बेस्ट`च्या क्षेत्रात टाटा पॉवरला वीज वितरणाची परवानगी देणारा केंद्रीय वीज लवादाचा निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय. त्यामुळे उपनगरांमधील रहिवाशांना उपलब्ध असलेली टाटांची वीज आता दक्षिण मुंबईकरांनाही मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
मुंबईच्या उपनगरांत ‘रिलायन्स’च्या ग्राहकांना ‘टाटा पॉवर’चा स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने दक्षिण मुंबईतील बेस्टचे ग्राहकही टाटाकडे वीजेसाठी अर्ज करु लागले होते. मात्र, या ग्राहकांना ना हरकत देण्यास बेस्ट नकार देत होती.
‘स्थानिक स्वराज्य संस्थे’ला वीज कायद्यात अपवाद करण्यात आल्याच्या कलमाचा आधार घेत बेस्टने टाटाला आपल्या क्षेत्रात वीजवितरण करण्यास अटकावही केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सुरिंदर निज्जार आणि ए.के. सिक्री यांच्या खंडपीठाने बेस्टचे सर्व मुद्दे फेटाळून लावले. त्यामुळे आता टाटाची स्वस्त वीज मुंबईकरांना उपलब्ध होउ शकणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.