www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तब्बल आठवडाभरानंतर मुंबई गँगरेप प्रकरणातील पीडित तरुणीला जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. गेल्या गुरुवारी, सामूहिक बलात्काराला सामोरी गेलेली ही २३ वर्षीय पीडित तरुणी मोठ्या धाडसानं जखमी अवस्थेत जसलोक रुग्णालयात दाखल झाली होती.
संपूर्ण वैद्यकीय तपासणीनंतर मंगळवारी रात्री उशिरा या तरुणीला जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. वैद्यकीय तपासणीमध्ये तरुणीची प्रकृती आता ठिक असल्याचं सांगण्यात आलंय. लोअर परळमधील शक्ती मिल इथं झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी रुग्णालयात दाखल झाली होती. जसलोक रुग्णालय प्रशासनाने तिच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमले होते. या पथकाने तरुणीची तपासणी केल्यानंतर तिची प्रकृती ठीक असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, तरुणीला रुग्णालयाच्या वतीने उच्च दर्जाच्या आरोग्य सेवासुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाय रुग्णालय प्रशासनाने आरोग्याच्या सुविधा पुरवताना कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही, असेही रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ग्यानचंदाणी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींजवळ स्पष्ट केलंय.
दरम्यान, या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीय. या पाचही आरोपींना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. बुधवारी, आरोपींना घटनास्थळी (शक्ती मील) नेण्यात आलं होतं. घटनास्थळी आणल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींकडून त्यादिवशी काय झाले, याची सविस्तर माहिती घेतली. या माहितीची खटल्यात मदत होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.