आत्महत्या करायला गेली, पण मुलीला गमावलं!

आत्महत्या करायला गेलेल्या मातेनं आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलंय. भांडूपच्या कोकणनगर परिसरात राहणाऱ्या गावकर कुटुंबाच्या दुर्दैवाची ही कहाणी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 9, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आत्महत्या करायला गेलेल्या मातेनं आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलंय. भांडूपच्या कोकणनगर परिसरात राहणाऱ्या गावकर कुटुंबाच्या दुर्दैवाची ही कहाणी...
भांडूपच्या एका चाळीत राहणाऱ्या विनायक गावकर आणि त्याची पत्नी वैदेही गावकर या दोघांमध्ये गेल्या आठवडयाभरापासून भांडण सुरू होतं. विनायकचं दारुचं व्यसन हा भांडणाचा मुद्दा... विनायक ऐकण्याचं नाव घेईना तेव्हा वैदेही आत्महत्येच्या विचारानं घराबाहेर पडली. सोबत तिची चार वर्षांची चिमुरडी देवयानीही होती. बाहेर पडताना वैदेहीने देवगडमध्ये राहाणार्याच आपल्या बहिणीला मी आत्महत्या करतेय, असा मेसेज पाठविला. तसंच पोलिसांच्या नावे लिहिलेल्या एका सुसाईड नोटमध्ये ‘जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे, कुणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूरही लिहून ठेवला.

जवळच्याच शिवाजी तलावाजवळ पोहचल्यावर मात्र आपल्या चिमुरडीकडे पाहून तिला घेऊन पाण्यात उडी मारणं वैदेहीला शक्य झालं नाही. तिनं देवयानीला जवळच्याच एका दगडावर बसवून पाण्यात उडी घेतली. आई बुडत आहे हे पाहून चार वर्षाच्या मुलीनेही पाण्यात उडी घेतली. पुढे आपली मुलगी बुडत असल्याचे लक्षात येताच आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तीनं हातपाय मारून देवयानीला गाठलं आणि तलावाकाठी असलेल्या एका दोरीचा आधार घेउन ती पाण्यात तरंगू लागली. सकाळी एका पालकाने फोन करताच पोलिसांनी बचावकार्य करून वैदेही आणि तिच्या कवेत असलेल्या देवयानीला बाहेर काढल. सुरूवातीला मधू रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. या घटनेत आई बचावली असली तरी चिमुरडीला मात्र आपले प्राण गमवावे लागल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
दरम्यान, पोलिसांनी आई वैदेहीवर आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि निष्काळजीपणामुळे मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा नोंदिवलाय. या प्रकरणी स्थानिक पतपेढीत मॅनेजर असलेल्या वैदेहीच्या पतीला - विनायकलाही अटक होण्याची शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.