म्हाडाचं घरं... अन् हेलपाटे घालून मर!

म्हाडानं घरांसाठी नवीन जाहिरात दिलीय. पण, म्हाडाचं घर घेणं म्हणजे काय दिव्य असतं, ते अनुभवायचं असेल तर मालाड मालवणी भागातील म्हाडा कॉलनीला भेट द्यायलाच हवी.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 2, 2014, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
म्हाडानं घरांसाठी नवीन जाहिरात दिलीय. पण, म्हाडाचं घर घेणं म्हणजे काय दिव्य असतं, ते अनुभवायचं असेल तर मालाड मालवणी भागातील म्हाडा कॉलनीला भेट द्यायलाच हवी.
घराचं  स्वप्न  साकार व्हावं म्हणून डोळे लावून बसलेल्या चार हजार नागरिकांना २०११ मध्ये म्हाडाची लॉटरी लागली आणि त्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. पण ते घर ताब्यात मिळवण्यासाठी सुरू झाली खडतर लढाई...
तीन वर्षांनंतर मिळाला घराचा ताबा
अनेक अर्जविनंत्या आणि हेलपाटे मारुन मारून कंटाळलेल्या लोकांना प्रत्यक्ष घराचा ताबा मिळायला तब्बल तीन वर्षे लागली. अखेर ताबा मिळाला, पण स्वप्नातलं घर प्रत्यक्षात उतरलचं नाही... ताब्यात मिळालेल्या घराचा  निकृष्ट दर्जा पाहून आपले कष्टाचे  पैसै पाण्यात गेल्याचं दु:ख त्यांच्या वाटयाला आलं. सुमार दर्जाचं बांधकाम नशिबी आलं.. महापालिकेनं  गाजावाजा केलेला वॉटर रिसायक्लिंग प्रोजेक्ट सुरुच झालेला नाही.
समस्यांचा विळखा... घराचं समाधानही नाही
घरात जाण्याचाही मार्ग खडतर आहे. इथल्या २४ मजली इमारतीची लिफ्ट अनेकदा बंद पडते. मग काय जिने चढण्याशिवाय पर्याय नसतो... अचानक वीज गेली तर पर्यायी व्यवस्था नाही... नावाला जनरेटर आहे पण तोही बंद अवस्थेत... त्यात सहा महिन्यातच पाण्याची गळती सुरू झाल्यानं रहिवाशी त्रस्त झालेत. 
व्यवस्थित न बसवलेल्या फरश्या...  इमारतीच्या परिसरातच बांधकाम साहित्याची अडगळ... म्हाडाच्या  घरात राहणाऱ्यांच्या समस्या संपता संपत नाहीत... घरांसाठी म्हाडानं आता नव्यानं जाहिरात काढलीय. या रहिवाशांनी तर ठेच लागलीय, पण त्यांच्या अनुभवातून बाकीचे लोक शहाणे होतील का?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.