www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत सामूहिक बलात्काराला बळी पडलेली पत्रकार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु तिला जोरदार मानसिक धक्का बसलाय. या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला वेळ लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये ही माहिती दिली गेलीय. संबंधित तरुणीवर मुंबईच्या जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी मुलगी सध्या ‘आयसीयू’मध्ये नसल्याचंही सांगण्यात आलंय. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. ती थोडं फार बोलू शकलीय. तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आलीय.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी पीडित फोटोग्राफर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास लावण्यात यशस्वी ठरल्याचा दावा केलाय. एका आरोपीला अटकही करण्यात आलीय. गँगरेप पीडित तरुणीच्या मित्रानं या आरोपीला ओळखलंय.
मुंबई पोलीस कमिशनर डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज दुपारी दीड वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. स्केचच्या आधारे एका आरोपीला पकडण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. या आरोपीचं नाव अब्दुल सत्तार ऊर्फ चांद बाबू आहे. इतर आरोपींचीही ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. परंतु, त्यांची नाव मात्र आत्ताच जाहीर करणं पोलिसांनी टाळलं.
मुंबईच्या महालक्ष्मी स्टेशन परिसरात शक्ती मिल असली तरी इथला परिसर निर्जन असून त्याचाच या गुन्हेगारांनी गैरफायदा घेतला. हे आरोपी तुम्हाला कुठं आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना त्यांची खबर द्या. कारण मुंबई पोलीस सर्वत्र यांचा शोघ घेत आहेत. या नराधमांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी २७ पथकं तयार केली आहेत. त्यापैंकी पाच पथकं राज्यातील विविध ठिकाणी तर दोन पथकं राज्याबाहेर तपासासाठी रवाना झाले आहेत.
पोलिसांना या चारही गुन्हेगारांची माहिती मिळाली असून त्यापैकी दोघजण सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. सर्व आरोपी धोबीघाट परिसरातील रहिवासी असून शक्ती मिलच्या ओसाड इमारतीत त्यांचा नेहमीच वावर असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणात केवळ एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून उरलेल्या चार आरोपींना जेरबंद करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.