डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार

केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. 

Updated: Sep 25, 2015, 10:17 PM IST
डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार  title=

कृष्णात पाटील, मुंबई : केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. 

ज्यांनी उपचार करायचे त्यांच्यावरच उपचार करण्याची वेळ केईएम रुग्णालयातील या तीन निवासी डॉक्टरांवर आलीय. डॉ. सुहास चौधरी, डॉ. कुशाल आणि डॉ. पूनीत अशा या तिघांची नावे आहेत. बालरुग्ण विभागात हे तिघेही कार्यरत असताना गुरूवारी रात्री अकरा वाजता साडे तीन वर्षाचा अबू सोफिया या डेंग्यू झालेल्या मुलाला अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले. परंतु पहाटे चार वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही तो वाचू शकला नाही. परंतु यामुळं संतप्त झालेल्या मृत मुलाच्या चार नातेवाईकांनी या तीन डॉक्टरांवर लोखंडी स्टूल, रॉडच्या सहाय्यानं हल्ला केला. एव्हढंच नाहीतर उशिरा पोहचलेल्या महिला सुरक्षा रक्षकाच्या हातातील काठी घेऊन डॉक्टरांना मारहाण केली. यानंतर पोलिसांनी मेहराजुद्दीन कुरेशी आणि जुनेद कुरेशी या दोघांना ताब्यात घेतले. डॉक्टर उपचार करत नसल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा मृत मुलाच्या आईनं केलाय.

या घटनेच्या निषेधार्थ आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव नेहमीप्रमाणे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं संपाचे हत्यार उपसले. यामध्ये सुमारे ७८४ डॉक्टर सहभागी झाले. परिणामी रूग्णसेवा विस्कळीत झाली. दूरवरून आलेल्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

डॉक्टरला देव मानण्याची भारतीय परंपरा आहे. एखाद वेळी डॉक्टरांच्या हातून चूक होतही असेल. अखेर त्यांच्याही काही मर्यादा आहेत. या समजून न घेता अशा प्रकारे हल्ले होत असतील तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.