www.24taas.com, मुंबई
आदर्श सोसायटीला जमीन बहाल करण्याचा निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच घेतला होता, असं स्पष्ट करत राज्य सरकारनं अखेर आदर्शचे खापर विलासरावांच्या माथी फोडलं आहे.
द्विसदस्यीय चौकशी आयोगासमोर राज्य सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या चार पानी प्रतिज्ञापत्रामध्ये हा दावा करण्यात आलाय. राज्याचे मुख्य सचिव जे. के. बांठिया यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं. राज्य सरकारची जमीन बहाल करण्यासंदर्भातील परिपत्रकाचा दाखला देत आदर्शला जमीन देण्याचा निर्णय विलासरावांनी घेतला होता, असा दावा त्यांनी केला आहे.
या परिपत्रकानुसार, मुंबईतील सरकारच्या मालकीची जमीन बहाल करण्याचा वा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. आदर्श सोसायटीला जमीन बहाल करण्यात आली. त्यावेळेस विलासराव मुख्यमंत्री होते.