खांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही. 

Updated: Jan 5, 2017, 11:07 PM IST
खांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही. 

आज मातोश्रीवर सायंकाळी पाच वाजता सुरु झालेली दमानिया, उद्धव ठाकरे, शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना पदाधिकारी, खांबाटा एव्हिएशनचे व्यवस्थापन अशी बैठक प्रचंड वादग्रस्त बनली. सुमारे चाळीस वर्षे एअरपोर्ट ग्राउंड हॅंडलिंग मध्ये कार्यरत असलेल्या या कम्पनीत सुमारे 2100 कर्मचारी आहेत. त्यांना गेले अनेक महिने पगार मिळत नसल्याचे प्रकरण आहे. 

आणि खटका उडाला..

थकीत पगाराची कोट्यवधींची देणी आहेत. आज याच प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवर बैठक सुरु असतानाच मुख्यमंत्र्यानी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्याचे आदेश कम्पनी व्यवस्थपणाला देत शिवसेनेला शह काटशह देण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार मंत्र्यानी या कर्मचाऱयांना न्याय मिळवून दिल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे मातोश्रीवर सुरु असलेल्या बैठकीत दमानिया यांचा चर्चेदरम्यान खटका उडाला.

 बैठक अर्धवट सोडत दमानिया मातोश्रीतून संतापून बाहेर पडल्या. त्यामुळे मोठी धावपळ झाली. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दमानिया यांची समजूत काढून त्यांना पुन्हा बैठकीत सहभागी केले. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत कामगारांच्या न्याय देण्याचे आश्वासन ठाकरे आणि दमानिया यांच्याकडून देण्यात आले.

'' कंबाटाचे सर्व कामगार इथे आले. उद्धव जींनी GVKची टॉप मॅनेजमेन्टची लोकं याठिकाणी आले होते. GVK सोबत बाचाबाची झाली. BWFS त्यांची मालमत्ता ठेऊन रक्कम शनिवारी चुकवणार. उद्या तहसीलदार आणि पोलीस फोर्स घेऊन मालमत्ता जप्त करतील. - अंजली दमानिया 

''मातोश्रीमधून हक्काने आलात. रिकाम्या हाती तुम्ही जाणार नाही. अंजली ताई आल्या म्हणजे गरमागर्मी झालीच पाहिजे नाहीतर त्या अंजली ताई कसल्या. GVK आणि बर्ड्स कंपनीने मागण्या मान्य केल्या आहेत. इकडे तिकडे भटकण्याची आता तुम्हाला गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या श्रेय वादावर मला काही बोलायच नाही. कामगारांना काय ते विचारा. -  उद्धव ठाकरे 

श्रेयाचं राजकारण सुरू

दरम्यान, मुंबईतल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचा-यांवरून भाजप-शिवसेनेत पुन्हा श्रेयाचं राजकारण सुरू झालंय. खंबाटा कंपनीतल्या कर्मचा-यांच्या थकीत वेतनाच्या मुद्यावरून आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठातरे यांनी भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला खंबाटातल्या कर्मचा-यांचे प्रतिनिधीही हजर होते. मात्र थकीत वेतनाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनाला शह दिला. मुख्यमंत्र्यांनी कर्मचा-यांचे थकीत वेतन त्वरीत देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशन कंपनीला दिले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडीच करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.