www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याणच्या रोहन गुच्छेत अपहरण आणि हत्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना निलंबित करण्यात आलंय. तायडेंसह आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. तायडे हे तपास करतांना गुच्छेत कुटुंबियांशी बेजबाबदारपणे बोलले होते असा आरोप आहे. गुच्छेत कुटुंबियांनी तायडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
ठाण्याचे पोलिस आयुक्त विजय कांबळे यांनी या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिल्यानंतर पी.आय. रविंद्र तायडे आणि पी.एस.आय. आर. एम. गोळे या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोघेही बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
रोहन दुपारी ११ वाजता बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी चार वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनमधे गेल्यानंतर तब्बल तीन तासांनी पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला तसंच, चौकशीसाठी पोलीस युनिफॉर्ममध्ये घरी आल्यानं आरोपी सावध झाल्याचा आरोप ही रोहनचे वडील उत्तमचंद यांनी केला.
रोहनचा मृतदेह हाती आल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी वादग्रस्त विधानं करून त्यांच्या गुच्छेत कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्नही केला होता. तसंच, गुच्छेत यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळं हा तपास उपायुक्त जाधव यांच्याकडे सोपविला होता
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.