लोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'

जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय. 

Updated: Sep 26, 2014, 05:22 PM IST
लोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'   title=

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय. 

राष्ट्रवादीचे मुंब्रा – कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी, त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदर्श फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं कबूल केलंय.

महत्त्वाचं म्हणजे, 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र, जितेंद्र आव्हाड यांना आपल्या या फ्लॅटचा विसर पडला होता... त्यांच्याविरुद्ध आदर्श इमारतीत आपला फ्लॅट असल्याची माहिती दडवल्याचा मुद्दा अजून हायकोर्टात सुरू आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगांवकर यांनी ठाण्यातील दंडाधिकारी कोर्टात याबाबत खासगी तक्रार दाखल केली होती. हा खटला रद्द करण्याची मागणी करत आव्हाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

पण, आता विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात मात्र आदर्श इमारतीमधला 601 क्रमांकाचा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आव्हाडांनी कबूल केलंय. या फ्लॅटची सरकारी किंमत ७९ लाख २६ हजार २५७ रुपये इतकी होती. पण, हा फ्लॅट सध्या आपल्या ताब्यात नाही (नॉट इन पझेशन) असा उल्लेख त्यांनी या प्रतिज्ञापत्रात केलाय. 

उत्पन्नाचा उल्लेख करताना 2013-14 चं आव्हाडांनी आपलं एकूण उत्पनन 2 कोटी, 5 लाख, 26 हजार, 887 रुपये इतकं दाखवलंय. यामध्ये, 50 हजारांची रोकड आणि बँक खात्यांमध्ये 5 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी तसंच 2 कोटी, 55 लाख, 84 हजार, 468 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं म्हटलंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.