मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यंदाच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याच एका पक्षाच्या पारड्यात बहुमताचे दान दिले नाही.
या महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ८४ + ४ अपक्षांची साथ =८८ आहे तर भाजपचे संख्याबळ ८२ आहे. कोणत्याही पक्षाला बहुमताचा ११४ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी इतरांची मदत घेणे गरजेचे आहे.
मात्र हा जादुई आकडा महापौर पदाच्या निवडीसाठी गरजेचा नाहीये. महापौरपदाची निवडणूक ९ मार्चला होणार आहे. या निवडणुकीत मुंबईच्या महापौराची निवड केली जाणार आहे. मात्र या निवडीसाठी बहुमताचा आकडा हवाच असं नाहीये.
महापौराची निवड ही ११४ या आकड्यावर अवलंबून नसते. तर निवडणुकीच्या दिवशी सभागृहातील उपस्थित नगरसेवक ज्याला बहुमताने निवडून देतात त्याची महापौरपदी निवड होते.
म्हणजेच निवडणुकीच्या दिवशी सभागृहात उपस्थित असलेल्यांपैकी सर्वाधिक मते ज्या उमेदवाराला त्याची निवड महापौर म्हणून केली जाते.
उदाहरणार्थ, चार नगरसेवक महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यापैकी एका नगरसेवकाला ४० मते पडली, दुसऱ्या नगरसेवकाला ३०, तिसऱ्या नगरसेवकाला २० तर चौथ्या नगरसेवकाला १० मते पडली तर सर्वाधिक ४० मते पडलेल्या नगरसेवकाची निवड महापौर म्हणून केली जाते.