हवी साथ! 'भूमी'ला आहे तुमच्या मदतीची गरज

माणुसकी कुठलाच भेद मानत नाही. कसल्याच भिंतीत बांधली जात नाही... एका गुजराती मुलीच्या भरमसाठ उपचारखर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी, दोन सामान्य मराठी तरुण जीवाचं रान करत आहेत. ते शोधत आहेत माणुसकीची साथ... 

Updated: Jul 19, 2015, 10:10 PM IST
हवी साथ! 'भूमी'ला आहे तुमच्या मदतीची गरज title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: माणुसकी कुठलाच भेद मानत नाही. कसल्याच भिंतीत बांधली जात नाही... एका गुजराती मुलीच्या भरमसाठ उपचारखर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी, दोन सामान्य मराठी तरुण जीवाचं रान करत आहेत. ते शोधत आहेत माणुसकीची साथ... 

भूमी सुरेश वेदवाला... १४ वर्षांची ही मुलगी सध्या मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जून महिन्यामध्ये भूमीला काविळ झाली आणि त्याचा परीणाम थेट तिच्या यकृतावर झाला. वडील सुरेश वेदवाला यांनी स्वतःचं यकृत भूमीला देऊन तिचा जीव वाचवला. यासाठी त्यांना चौतीस लाख रुपये खर्च आला. विरारमधल्या घरासह स्वतःजवळचं होतं नव्हतं ते सगळं विकून सुरेश वेदवाला यांनी ही रक्कम कशीबशी उभी केली. मात्र आणखी पंचवीस-सव्वीस लाख रुपये भूमीच्या उपचारांसाठी लागणार आहेत. त्यातच सुरेश वेदवाला अस्थायी कर्मचारी असल्यानं, रेल्वेनं आर्थिक मदतीबाबत हात वर केले आहेत. 

अशात पुढे सरसावले ते सुरेश वेदवाला यांच्या चुलत भावाचे दोन मराठी मित्र प्रवीण समजस्कर आणि राजू सुखी... ही मोठी रक्कम उभारण्यासाठी त्यांनी आमदार, खासदार, मंत्र्यांची भेट घेतली, मात्र पोकळ आश्वासनांखेरीज त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. 

प्रवीण समजस्कर आणि राजू सुखी यांच्यातल्या माणसाला, वेदवाला कुटुंबाची वेदना जाणवली. याच माणुसकीची अपेक्षा ते आता समाजाकडून बाळगून आहेत. या घडीला माणुसकी जिंकणार का यापेक्षा, समाज माणुसकीला जिंकू देणार का याचीच परीक्षा आता होणार आहे. 

जर आपणाला मदत करायची असेल तर...

भूमी वेदवाला हिला जीवनदान देण्यासाठी, तुम्ही तुमच्यापरीनं आर्थिक मदत करु शकता. यासाठी आम्ही भूमीचे वडील सुरेश वेदवाला यांच्या बँकखात्याची माहिती इथे देत आहोत. 

बँक नाव : State Bank of Hyderabad
अकाऊंट नंबर : 62107264951 
IFSC CODE : SBHY0021095
अकाऊंटधारकांचं नाव : Suresh Narsibhai Vedwala, Chandrika Suresh Vedwala
अकाऊंट प्रकार : Savings Joint a/c
बँक शाखा : Virar, Palghar - 401303
सुरेश वेदवाल मोबाइल नंबर : 9920545580 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.