दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महापालिकेच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने डोके वर काढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. आधीच मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसचे मुंबईत होणार काय असा सवाल उपस्थित केला जातोय.
एकेकाळी मुंबई महापालिकेत निर्विवाद सत्ता असणारी काँग्रेस सध्या मुंबईतील अस्तित्वासाठी झगडत आहे. दोन वर्षापूर्वी काँग्रेसने संजय निरुपम या शिवसेनेतून आलेल्या लढवय्या नेत्याना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले. उत्तर भारतीय असणाऱ्या निरुपम यांच्या निवडीबरोबरच पक्षात त्यांच्याविरोधात सूर निघू लागला. मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत संघर्ष होऊ लागला, त्यातून निरुपम यांना टार्गेट केले जाऊ लागले. मात्र कालांतराने हा विरोध बंद झाला किंवा विरोध करणारे शांत बसले. आता मुंबई महापालिकेच्या तोंडावर पुन्हा एकदा या विरोधाने डोके वर काढले आहे. उमेदवार निवडीवरून आता हा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाची ठिणगी मागील आठवड्यात पडली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत उमेदवार निवड प्रक्रियेत आपण सहभागी नसल्याचा मॅसेज आपल्या समर्थकांना पाठवला. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा कामत यांनी ट्विटरवरून निरुपम यांच्यावर निशाणा साधला आहे.
या ट्विटला निमित्त झाले ते काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात केलेला प्रवेश... मात्र कृष्णा हेगडे यांचा पक्ष सोडणे आणि कामत यांचे ट्विट यावरून निरुपम यांनी हेगडे आणि कामत या दोघांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पक्षाला नवी नाही. यापूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या गटांमध्ये संघर्ष होता. देवरा यांच्या निधनानंतर देवरा गट कमजोर झाला, दरम्यान प्रिया दत्त यांचा एक गट सक्रीय झाला होता, तो गटही सध्या शांत आहे. संजय निरुपम यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर निरुपम यांचा गट तयार झाला आहे आणि या गटाला आता कामत गट टक्कर देत आहे.
गटातटाच्या राजकारणात मागील 20 वर्ष मुंबई महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही, अंतर्गत संघर्षाचा मुकाबला करण्यातच काँग्रेस नेत्यांची शक्ती वाया जात असल्याने ते निवडणुकी विरोधकांचा सामना करायला कदाचित कमजोर पडत असावेत.