'महाराष्ट्र सदन' घोटाळ्यात भुजबळांची चौकशी होणार

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची एसीबीमार्फत चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ही चौकशी होणार आहे. 

Updated: Oct 23, 2014, 10:20 PM IST
'महाराष्ट्र सदन' घोटाळ्यात भुजबळांची चौकशी होणार  title=

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची एसीबीमार्फत चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ही चौकशी होणार आहे. 

राज्याच्या गृह विभागानं एसीबीला चौकशी करण्य़ाची परवानगी दिलीय. महाराष्ट्र सदनासह मुंबईतील दोन इमारतींच्या विकास प्रकरणीही चौकशी होणार आहे. यामुळे भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. 

काय आहे प्रकरण
'महाराष्ट्र सदन'च्या कंत्राटापोटी मेसर्स चमणकर एंटरप्रायझेसला मिळालेल्या शंभर कोटी रुपयांपैकी काही रक्कम ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड व इदीन फर्निचर या दोन कंपन्यांना देण्यात आली होती. या दोन कंपन्यांवर भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांचे नियंत्रण असल्याचा दावा असल्याचा आरोप आहे. १२ फेब्रुवारी, २०१० ते २० जानेवारी, २०१२ या कालावधीत ७४.१० लाख रुपये इदीन फर्निचर यांना देण्यात आले होते. त्या कंपनीचे संचालक पंकज भुजबळ यांची पत्नी विशाखा भुजबळ व समीर भुजबळ यांची पत्नी शेफाली भुजबळ आहेत. 

तसेच ७ डिसेंबर, २००७ आणि ९ मे, २०११ रोजी ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरला ३६.७७ लाख रुपये देण्यात आले होते. ही कंपनी भुजबळ यांच्या नियंत्रणाखाली असून त्याचा एक कर्मचारी संजय जोशी हा संचालक आहे व भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचा तो कर्मचारी असल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने याआधी भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरणही मागवले होते.

नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालात महाराष्ट्र सदन बांधकामाच्या कंत्राटात राज्य शासनाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आमदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील याप्रकरणाच्या चौकशीसाठी लोकलेखा समितीनेही महाराष्ट्र सदनाची पाहणी केली होती.

भुजबळ यांची चौकशी झाल्यास व त्यात ते दोषी सापडल्यास भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.