www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना यंदा महापालिकेच्या अजब कारभाराचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसलाय. मैदानांवर गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यास मंडळांना परवानगी नाकारण्यात आलीय. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं विरुद्ध महापालिका असा संघर्ष सुरु झालाय.
महापालिकेच्या या नोटिशीनं सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची झोप उडवलीय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी महापालिकेकडे गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी मागितली. पण, यंदा मंडळांना ती परवानगी नाकारली जातेय. महापालिका प्रशासानानं विभागीय कार्यालयांना पाठवलेल्या परिपत्रकानुसार मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूभागावार कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी देता येणार नसल्याचं म्हटलंय. या परिपत्रकाचा फटका शिवडीच्या शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही बसलाय. गेल्या ६२ वर्षांपासून हे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतं. महापालिकेनं मंडपाला परवानगी नाकारल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
काळाचौकीमधल्या अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची परिस्थितीही वेगळी नाही. या मंडळालाही परवानगी नाकरल्याच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. १९५७ पासून हे गणेशमंडळ गणेशोत्सव साजरा करतंय.
अडचणीत सापडलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी ‘सार्वजिनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती’ उभी राहिलीय. कुठल्याही परिस्थितीत गणशोत्सव साजरा होणारच, अशी भूमिका समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी घेतलीय.
परवानगीच्या या नाट्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं विरुद्ध महापालिका असा संघर्ष सुरु झालाय. त्यावर वेळीच तोडगा निघणं गरजेचं असल्याचं मत गणेशभक्तांनी व्यक्त केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.