www.24taas.com, मुंबई
आज सकाळी मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला भागात एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत मोठं नुकसान झाल्याचं समजतंय.
‘बीकेसी’ भागातील एफआयएफसी म्हणजेच फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्सिअल सेंटर इमारतीच्या १२ व्या मजल्याला ही आग लागली होती. या इमारतीचं बांधकाम सध्या सुरू असल्याचं समजतंय. एका मजल्यावर लागलेली ही आग काही वेळातच आजुबाजूलाही पसरली. त्यामुळे वरच्या मजल्यांवरही आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता.
पण ही आगीची वार्ता समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलानं शर्थिचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या आणि सहा टँकर्समार्फत ही आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न बराच वेळ सुरू होते. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला बऱ्यापैकी यश आलयं. या इमारतीत इंटिरिअरचं काम सुरू होतं. सुदैवानं याठिकाणी कुणीही नसल्यानं जीवितहानी टळलीय. मात्र इमारतीचं मोठं नुकसान झालय.
ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र अजूनही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.