३० कोटींची लाच स्वीकारताना खडसेंच्या 'त्या' पीएला अटक

एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आलीय.

Updated: May 15, 2016, 09:08 AM IST
३० कोटींची लाच स्वीकारताना खडसेंच्या 'त्या' पीएला अटक title=

मुंबई : एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आलीय.

खडसेंचा पीए... 

आपण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलनं सांगितलं होतं. मात्र, आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरुपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसे यांनी केलाय. 

खडसेंचा खुलासा

पाटील हा मुळाच मुक्ताईनगरचा राहणारा आहे. जळगाव जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना मुंबईत उपचारासाठी आणत असत. सामाजिक काम करणारी तालुक्यातील व्यक्ती, या नात्यानं आपली आणि पाटील याची ओळख असली तरी तो आपला कर्मचारी नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलंय. आपल्या नावाचा गैरवापर करत असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलीये...  

काय आहे प्रकरण

एका संस्थेला कल्याण इथली जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती. यातला १५ कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहाथ अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.

अजित पवार गप्प का?

एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयाचं लाच प्रकरण आणि किरीट सोमय्यांचा आरोप या मुद्यावर, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.