मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुधवारी मुंबई रेल्वे पोलिसांच्या सेफ्टी अलर्ट मेसेम एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर या कॅम्पेनचे अनावरण केले. या कार्यक्रमादरम्यान त्याने लहानपणीचा रेल्वे रुळ ओलांडल्याचा किस्साही सांगितला. मात्र या घटनेनंतर आपण कधीही रेल्वे रुळ ओलांडला नाही असेही त्याने पुढे नमूद केले.
वयाच्या ११व्या वर्षापासून मी लोकल ट्रेनचे धक्के खात प्रवास केला. त्यात माझ्यासोबत क्रिकेट किटही असायची. याचदरम्यान एकदा मी माझ्या मित्रांसोबत पहिल्यांदा रेल्वे रुळ ओलांडला. मात्र तो अनुभव भयानक होता.
रेल्वे रुळ ओलांडताना समोरुन येणाऱ्या वेगवान रेल्वेला पाहून आमच्यातील त्राणच गेले आणि आम्ही तेथेच दोन्ही पटरींच्या मध्ये गुडघे टेकून बसलो. रेल्वे तेथून गेल्यानंतर जीवात जीव आला. मात्र त्यानंतर कधीही रेल्वे रुळ ओलांडला नाही. यावेळी त्यांने मुंबईकरांना रेल्वे रुळ न ओलांडण्याचे आवाहनही केले.