मुंबई : १० महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. यातच शिवसेना-भाजप युतीची चर्चाही गरम झाली आहे. कटूता येऊ न देता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीबाबत लवकर निर्णय घेण्याचा आग्रह केला आहे.
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. त्यामुळे युतीबाबत काय निर्णय घ्यायचा तो लगेच घ्या, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. त्यांनी 'मातोश्री'वर मुंबईतले विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली. दोन्ही पक्षांचे नेते आज प्राथमिक चर्चा सुरू करतील अशी सूत्रांची माहिती आहे. जागावाटपाबाबत निर्णय मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच घेतील असं समजतंय. रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. बैठकीला भाजपचे संघटनमंत्री आणि पक्षाचे पालकमंत्री सहभागी झाले होते.