मुंबई : पालिका प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत येत्या तीन तारखेला बांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सोडतीच्या कामाला सुरूवात होईल असं महापालिकेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेत शहरातील सात वॉर्ड कमी करण्यात आलेत. तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत. यामुळं शहरातील नगरसेवकांची संख्या ६३ वरून ५६ होणार आहे.
ए ( फोर्ट), बी( पायधुनी),सी(चंदनवाडी),डी (ग्रँट रोड) ई( भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक तर जी दक्षिण ( प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणारेत. पूर्व उपनगरात एम पूर्व ( चेंबूर),एन ( घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी झाले असून एल ( कुर्ला) आणि एस (भांडूप ) विभागात एक वॉर्ड वाढला आहे तर एम पूर्व ( मानखूर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत. पश्चिम उपनगराती एच पूर्व ( सांताक्रूझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. तर पी दक्षिण ( गोरेगाव) आणि आर उत्तर ( दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढलीय. तसंच पी उत्तर ( मालाड),आर दक्षिण( कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.