मुंबई : आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 26 जिल्हा परिषदा, 10 महापालिकामध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरापर्यंत भाजपाची मॅरेथॉन बैठक झाली. यावेळी भाजपाचे संघटनमंत्री आणि जिल्ह्याची जवाबदारी असलेले पालकमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेनेशी सकारात्मक म्हणजेच कटुता ने घेता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्री यांनी मांडली आहे. विशेष करून जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यांनी युतीचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी यावेळी धरल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
काही जिल्हा परिषद वगळता भाजप किंवा युतीला निवडणुकांमध्ये फारसे यश कधीच मिळालेलं नाही. सध्या सरकारला वातावरण अनुकूल आहे तेव्हा जास्तीत जास्त जिल्हा परिषद ताब्यात याव्यात असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. अशीच भूमिका महापालिका निवडणुकांमध्ये घेण्याचा आग्रह बैठकीत धरला गेला आहे. तेव्हा आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली नाही. मात्र आगामी निवडणुकांबाबत भाजप-सेनेमध्ये अजूनही प्राथमिक बैठक झालेली नाही. तेव्हा बैठकीसाठी कोण पुढाकार घेतं, युतीचा आग्रह कोणाकडून केला जातो, जागावाटप कसे केले जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.