www.24taas.com,मुंबई
रूग्णाला डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली आहेत ती औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर (औषध दुकानदार) कारवाई होणार आहे. ठरावीक कोर्स असताना गोळ्यांचे पूर्ण पाकीट घेण्याची केमिस्ट सक्ती करतात. त्यामुळे रूग्णांना नाहक भुर्दंड होतो. आता याला चाप बसणार आहे.
डॉक्टुरांनी रूग्णांना उपचारासाठी औषधांच्या गोळ्यांचा ठराविक कोर्स लिहून दिलेला असतो. असे असताना केमिस्टच्या आडमुठेपणामुळे गोळ्यांची संपूर्ण स्ट्रीप विकत घ्यावी लागते. केमिस्टच्या याच मनमानीविरोधात आता ग्राहक आणि ग्राहक संघटना सरसावल्या. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आत्मभान संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे अध्यक्ष सिध्दार्थ मोकळे यांनी सांगितले.
डॉक्टरांनी जेवढ्या गोळ्या दिल्या लिहून दिल्या असतील तेवढ्याच सुट्या गोळ्या केमिस्टला देणे आता क्रमप्राप्त आहे. याबाबत केमिस्टकडून औषध घेताना उपचारापुरत्या आणि हव्या तितक्या्च गोळ्या घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोठी सरकारी रुग्णालये असल्याने राज्याच्या इतर भागांतील सर्वसामान्य रुग्णांना तेथे यावे लागते; मात्र केमिस्टच्या मनमानीमुळे त्यांची अडवणूक होते. केमिस्टकडून औषधांसाठी होणारी बळजबरी ही ग्राहकांच्या जीवावर बेतणारी आहे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
केमिस्टच्या या मुजोरीची तक्रार अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री मनोहर नाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सर्वसामान्य रुग्णांना वेठीस धरून अनैतिकपणे पैसे कमावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे मोकळे यांनी सांगितले.