मनसे नगरसेवकाची दादागिरी

फोन उचलत नसल्याच्या रागानं मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर यांनी मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. पहिले रस्त्यावर आणि नंतर जबरदस्तीनं शाखेत नेऊन राठोड यांना धानुरकरांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं.

Updated: Aug 2, 2013, 02:36 PM IST

www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
फोन उचलत नसल्याच्या रागानं मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर यांनी मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. पहिले रस्त्यावर आणि नंतर जबरदस्तीनं शाखेत नेऊन राठोड यांना धानुरकरांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं. त्यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशीरा पोलिसांनी धानुरकरांना ताब्यातही घेतलं.
कबुतरखान्याजवळ असलेल्या एका शेडबाबत धानुरकर यांनी जी/उत्तर विभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना फोन केला होता. मात्र फोन न उचलल्यानं संतापलेल्या धानुरकरांनी गुरुवारी दुपारी राठोड यांना गोखले रोड इथल्या मनसेच्या शाखेजवळ बोलावलं. राठोड तिथं गेले असता धानुरकरांनी त्यांना रस्त्यावरच मारहाण सुरू केली. नंतर शाखेत नेऊन लाथाबुक्क्यांनीही तुडवून राठोड यांना हाकलवून लावलं. दरम्यान, राठोड यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन धमकावणं, सरकारी कामात अडथळा, दंगल या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं.

दरम्यान, कनिष्ठ अभियंत्यास मनसे नगरसेवकानं केलेल्या मारहाणाच्या निषेधार्थ आज सकाळी सर्व अभियंता यांनी जी/उत्तर कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.