मुंबई : तंबाखू मळून तंबाखूची बुक्की तोंडात कोंबून चघळणाऱ्यांना चाप बसणार आहे. खबरदार! सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे तुम्हाला भारी पडू शकते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी घोषणाच सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुणाला कुठेही तंबाखू खाऊन थुंकणेच काय चघळताही येणार नसल्याचे दीपक सावंत यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आकारला जातो; परंतु आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना दंड आकारण्याऐवजी काही तास किंवा एक दिवस सार्वजनिक उपक्रमात काम करावे लागणार आहे. त्याबाबतचा कायदा लवकरच करणार असल्याचे सावंत म्हणाले.
दरम्यान, जीटी आणि कामा रुग्णालयाच्या परिसरात कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि केमोथेरपी सेंटर उभारणार आहे. याशिवाय नागपूर, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातही कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा विचार आहे. तसेच उपनगरात नवीन केमोथेरपी सेंटर उभारू, असे सावंत म्हणाले. विधानसभेत आमदार आशीष शेलार यांनी तंबाखूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर अर्धा तास चर्चेवर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.