मुंबई : मुंबईला आलेल्या आईला गावाला सोडून अविनाश मालप हे मुंबईला परतत होते. ते जयगड-मुंबई एसटीने मुंबईला परतत होते. मात्र हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला. असे काही घडेल यांची त्यांना किंवा त्यांच्या कुटुबियांना थोडीही कल्पना नव्हती.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री नदीला आलेल्या पुरात महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल वाहून गेला. त्याचदरम्यान या पुलावरुन जयगड-मुंबई एसटी बस जात होती. ही बस या पुरात वाहून गेलीये.
दुर्घटना होऊन तिसरा दिवस सुरु झाला असला तरी अद्याप अविनाश यांचा पत्ता लागलेला नाही. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसलाय.
चिपळूणमध्ये आल्यानंतर त्यांनी घरच्यांना फोन लावून सांगितले की मी चिपळूणला पोहोचलोय. मात्र त्यानंतर अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. अविनाश यांचा मुलगा पार्थ आपल्या वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. पप्पा, लवकर घरी या अशी आर्त हाक मारतोय हा चिमुकला.
दुर्घटनेनंतरचा तिसरा दिवस उलटला असून आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह हाती आलेत. सततच्या पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.