मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि प्रभाग क्र. 202 मधील शिवसेना उमेदवार श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येतोय.
21 फेब्रुवारीला मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी साडे पाच वाजल्यानंतर त्या बारादेवी शाळा मतदान केंद्रामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांसह गेल्या होत्या. त्याबाबतची व्हिडिओ क्लीपच झी 24 तासकडे आलीय.
ज्याठिकाणी मतदान यंत्रं ठेवली होती, त्या खोलीमध्ये त्या शिवसैनिकांसह गेल्या होत्या. ही बाब संबंधित मतदान केंद्राच्या निवडणूक अधिका-यांच्या लक्षात येताच त्यांनी श्रद्धा जाधव यांना हटकलं.
आपण माजी महापौर आहोत, असं सांगून त्यांनी निवडणूक कर्मचा-यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी उमेदवारांनी केलाय.
काही निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं त्या आत घुसल्या. श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केला असून, याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेस उमेदवार रिया बावकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार उमा भास्करन आणि मनसे उमेदवार प्रणाली बामणे यांनी केलीय.
तिन्ही उमेदवारांनी बुधवारी संध्याकाळी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जाधव यांच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली.