144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार

मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 144 जागा मिळाल्या नाही तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. 

Updated: Jul 4, 2014, 08:15 PM IST
144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार title=

मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 144 जागा मिळाल्या नाही तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. 

एव्हढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी एकदा स्वबळावर निवडणूक लढवावी, असंही आव्हान त्यांनी सर्वांना दिलंय. मनसेनं नाशिकमध्ये काय दिवे लावले? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला मुंबईच्या बकालपणावरून लक्ष्य केलंय. सिंचनाच्या घोटाळ्यावरून बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केलाय. 

युती आणि आघाडी... ‘एकला चलो रे’च्या मूडमध्ये....

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत युती तोडण्याची भाषा करण्यात आल्यानं, शिवसेनाही आता 'एकला चालो रे'साठी सज्ज झालीय... तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपावरून घमासान सुरू झालंय...

युतीमध्ये शिवसेनेला वाटा मिळतोय आणि भाजपचा मात्र घाटा होतोय. कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातली ही खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. शिवसेनेशी युती तोडून स्वबळावर 288 जागा लढवण्याची भाषा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला दिला.
 
भाजपच्या या आक्रमक पवित्र्याला 'जशास तसे' प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनाही सज्ज झालीय. 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका लढण्याची तयारी ठेवा, असे आदेश पक्षाकडून सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं युती तुटणार की काय अशी चर्चा रंगू लागलीय.

एकीकडे शिवसेना-भाजप युतीमध्ये दरार निर्माण झाली असताना, आघाडीतही जागावाटपावरून संघर्ष सुरू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला पुढे करण्यात आलाय. १४४ जागा मिळाल्या नाहीत, तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

यावर ‘अजित पवारांचं हे वैयक्तिक मत’ आहे. जागावाटपाबाबत आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, बाहेर नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय...

महायुती असो नाहीतर आघाडी. आगामी विधानसभा निवडणुकीत आपापला टक्का वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. आता, हा प्रेशर टॅक्टीजचा भाग आहे, की खरोखरच तुटेपर्यंत ताणण्याची तयारी आहे, हे काही दिवसांत समजेलच.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.