कोची : एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार दिला, यामुळे राज्यपालांना कोचीतच मुक्काम करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने प्रवास करत ते तिरूअनंतपुरमला पोहोचले.
केरळचे राज्यपाल पी. सथशिवम यांना मंगळवारी रात्री कोची विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला, ते विमानतळावर दाखल झाले होते, मात्र त्यावेळी विमानाची शिडी काढण्यात आली होती आणि एअर इंडियाच्या पायलटने त्यांच्यासाठी विमान थांबविण्यास नकार दिला. त्यामुळे पी. सथशविम यांना विमातळावरूनच माघारी परतावे लागले.
सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल कोचीन विमानतळावर विमान सुटण्याच्या १० मिनिटे आधी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत विमानात चढण्यासाठीची शिडी काढण्यात आली होती. एअर इंडियाच्या व्यवस्थापकांनी पायलटला राज्यपाल येत असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्याने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार देत विमानाचे दरवाजे बंद केले.
एअर इंडियाचे ए १०४८ हे दिल्ली-कोची-तिरूअनंतपुरम विमान रात्री ११.४० वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती आम्हाला एअर इंडियाकडून देण्यात आली होती. मात्र, राज्यपाल आणि त्यांची पत्नी ११ वाजून २८ मिनिटांनी विमातळावर आले. त्यावेळी विमानाची शिडी काढून घेण्यात आली आणि विमान धावपट्टीच्या दिशेने नेण्यात येत होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्यपाल येण्यापूर्वी एअर इंडियाचे अधिकारी विमानाजवळ त्यांचा बोर्डिंग पास घेऊनदेखील हजर होते. याबद्दल एअर इंडिया प्रशासनाला विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, विमानाचे दरवाजे बंद होऊन विमान धावपट्टीवर जात असताना राज्यपाल विमानतळावर आले.