'हार्बर' लाईनसाठी१२ डब्यांची लोकल दूरच

हार्बर रेल्वे मार्गावर 12 डब्यांच्या लोकलसाठी आणखी तीन वर्षं वाट पहावी लागणार आहे. सीएसटी ते मानखुर्द रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याच्या कामाला येत्या ऑक्टोबरनंतरच सुरुवात होणार असून हे काम 2014 पर्यंत पूर्ण होणार आहे.

Updated: May 11, 2012, 11:21 PM IST

अमित जोशी, www.24taas.com,मुंबई

 

हार्बर रेल्वे मार्गावर 12 डब्यांच्या लोकलसाठी आणखी तीन वर्षं वाट पहावी लागणार आहे. सीएसटी ते मानखुर्द रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याच्या कामाला येत्या ऑक्टोबरनंतरच सुरुवात होणार असून हे काम 2014 पर्यंत पूर्ण होणार आहे. तेव्हा हार्बर रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुखकर होण्यासाठी 2015 साल उजाडणार आहे.

 

हार्बर रेल्वे आणि जीवघेणी गर्दी असं समीकरण गेल्या काही वर्षांत तयार झालंय. हा नकोसा प्रवास हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना 9 डबे असलेल्या लोकलमधून करावा लागतो. गेल्या पाच वर्षात  हार्बर रेल्वे प्रवाशांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच नवी मुंबईत विमानतळ होण्याच्या निमित्ताने नवी मुंबईच्या लोकसंख्येत भर पडत चालली आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी हार्बर लोकल 12 डब्यांची करणं अत्यंत आवश्यक झालंय. मात्र सीएसटी ते मानखुर्द स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी 9 डबे लोकलसाठीचीच आहे. त्यामुळे 12 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल.

2015 च्या सुरुवातीलाच 12 डब्यांची लोकल हार्बर मार्गावर धावेल, असं लक्ष्य एमआरव्हीसीनं ठेवलं आहे. तोपर्यंत महत्वकांक्षी अशा हार्बर रेल्वेच्या जलद मार्गाच्या कामालाही सुरुवात झालेली असेल. तेव्हा उशीरा का होईना उपेक्षित असलेल्या हार्बरकडे रेल्वेने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे असंच म्हणावे लागेल.