स्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.

Updated: Mar 29, 2012, 07:04 PM IST

 

www.24taas.com, मुंबई

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.

 

प्रताप सरनाईक, राजन विचार आणि एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे यांची भेट घेतली. यापूर्वी, जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्या संदर्भात बातचित केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

शिवसेना आणि भाजपने बसपाचा उमेदवार दिल्याने मनसेने ही भूमिका घेतल्याचं राज ठाकरेंचे म्हणणं आहे. महायुतीच्या बसपा उमेदवाराला पाठिंबा देऊन उत्तर भारतातील पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा का असा सवाल याबाबतीत राज ठाकरेंनी केला आहे. थोड्या वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली होती.

 

जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथे भेट घेतली. ठाण्यातल्या राजकीय समीकरणां संदर्भात चर्चा झाली असल्याचं समजतं. ही चर्चा तब्बल चाळीस मिनिटे चालली.

 

ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता काबिज करण्यावरुन घमासान झालं होतं. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकल्याने सेनेचा महापौर विराजमान झाला. त्यानंतर झालेल्या नाशिकमध्ये शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेला पाठिंबा न देता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज ठाकरे संतप्त झाले होते.

 

मनसेने सेनेला धडा शिकवण्यासाठी ठाणे आणि औरंगाबादेत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे औरंगाबादमध्ये जवळपास दशकानंतर जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आली. तर ठाण्याच राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकावलं.

 

मनसेने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ठाणे महापालिकेतही पहिल्या दिवशीच प्रचंड गदारोळात सभा तहकूब करण्याची पाळी ओढावली. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे.