राष्ट्रवादीची नाराजी, काँग्रेसची बैठक

राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तातडीनं बैठक बोलावली. विधानभवनात काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यासह काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित आहेत.

Updated: Jul 23, 2012, 11:39 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तातडीनं बैठक बोलावली.  विधानभवनात काँग्रेसची बैठक सुरू आहे.

 

या बैठकीला मुख्यमंत्र्यासह काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री हटाव मोहिमेविरोधात प्रदेश काँग्रेस काय रणनिती आखणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

 

तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत काँग्रेस बद्दल तक्रार करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मुद्द्यांबाबत नाराजी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच राहणार की बाहेर पडून युपीए सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी आहे. या नाराजीचा राज्यातील सरकारवर परिणाम होणार की नाही, हे सुद्धा बैठकीत स्पष्ट होणार आहे.

 

राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम 

केंद्रातल्या काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेल्या राष्ट्रवादीनं राज्यातही मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम उघडलीय. राज्यातलं नेतृत्व बदल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचा रोख असून त्यांना हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न राष्ट्रवादीनं सुरू केले आहेत.

 

१७ महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात आलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सुरूवातीच्या काळात राष्ट्रवादीनं जुळवून घेतलं. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेची बरखास्ती, लवासा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, सिंचन या विषयांवरून राष्ट्रवादीला अचडणीत आणण्याची खेळी केली. त्यामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादीनं चव्हाण यांना हटवण्याचे पुरेपुर प्रयत्न सुरू केलेत.

 

आज होणा-या दिल्लीतल्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून याबाबत राज्यातले नेते भूमिका मांडणार आहेत. आजच्या बैठकीतल्या चर्चेला काँग्रेस कसा प्रतिसाद देतं त्यावर मुख्यामंत्र्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळं आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय.

Tags: