राज्यात दुष्काळ, पवार-मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडं साडेपाच ते सहा हजार कोटींची मागणी करणार आहे. यासंदर्भात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक आयोजित केली.

Updated: Aug 1, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडं साडेपाच ते सहा हजार कोटींची मागणी करणार आहे. यासंदर्भात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

मुख्यमंत्री आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळस्थितीची माहिती पवारांना देणार आहेत. त्याचबरोबर दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडून काय अपेक्षा आहे याबाबतही मुख्यमंत्री पवारांना माहिती देतील. राज्याने दुष्काळावर मात करण्यासाठी यापूर्वीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांबरोबरच केंद्राकडून असलेल्या मदतीच्या अपेक्षेवरही या बैठकीत चर्चा होईल.

 

राज्यातल्या ६९ तालुक्यात २५ ते ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस तर १४९ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. तर १० तालुक्यात तर २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळं या तालुक्यांतील खरीपाची पिकं धोक्यात आली. तर पिण्याच्या पाण्य़ाचा प्रश्नही गंभीर झाला. तत्पूर्वी काल पावसाअभावी दुष्काळाचं संकट ओढवलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारनं ७०० कोटीहून अधिक मदत देण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत केली.

 

देशातल्या १२ राज्यांत पावसाअभावी चिंताजनक स्थिती आहे. केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीनंतर पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची माहिती देत या राज्यांना मदतीची घोषणाही केली. देशात जुलैमध्येही सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती पवार यांनी दिली. दुष्काळी राज्यांना तातडीची मदत जाहीर करताना पवारांनी महाराष्ट्राला झुकतं माप दिलं. तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला १५ कोटी रुपये, जलसंधारणासाठी ५०१ कोटी रुपये आणि ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा पवार यांनी केली.