www.24taas.com , मुंबई
मुंबईकरांच्या स्वप्नातील स्वस्त घरांसाठी म्हाडाने आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली, मात्र, म्हाडाच्या साईटला भेट देणाऱ्या अनेकांची आज साईट बंद असल्याने निराशा झाली. टेक्निकल प्रॉब्लेममुळे म्हाडाची वेबसाईट बंद पडल्याचे म्हाडाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.
सॉफ्टवेअरच्या गोंधळामुळे इच्छुकांना अर्जच उपलब्ध झाले नाहीत.... या तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या दिवशी अनेक इच्छुकांना फॉर्म भरता आला नाही.
आज सकाळी दहा वाजल्यापासून म्हाडाच्या २५९३ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार होते. मुंबईकरांनी अर्ज भरण्यासाठी मोठा उत्साह दाखवल्यामुळे वेबसाईटवर आलेल्या लोडमुळे ती हँग झाली आणि काही वेळाने साईट बंद पडली.
ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र अद्यापही वेबसाईटसाठी आवश्यक असलेलं सॉफ्टवेअर अपलोड करणं शक्य झालं नाही. यासाठी आयटी तज्ज्ञ काम करीत असून लवकरच वेबसाईट सुरु होईल, असे स्पष्टीकरण म्हाडाकडून करण्यात आलं आहे.
आजचा एक दिवस वाया गेल्यानंतर अर्ज भरण्यासाठी आता केवळ १६ दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १९ मे असून ३१ मे रोजी याची ही सोडत निघणार आहे. या २५९३ घरांपैकी ८६७ घरं मुंबई शहरातील असतील तर इतर १७२६ घरं उपनगरात असणार आहेत.