www.24taas.com, मुंबई
गरिबीची व्याख्या काय मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणारी व्यक्ती अशी आहे असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल काय? नाही ना पण बॉम्बे पारसी पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयाला नेमकं तेच सांगितलं आहे.
फ्लॅट सबसिडीच्या दराने उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या पारसी व्यक्तीचे उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे तो गरीब असं पारसी पंचायतीचे म्हणणं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश पी.बी.मजुमदार आणि रमेश धनुका यांच्यासमोर पारसी पंचायतीचे अध्यक्ष दिनशॉ मेहता आणि इतर ट्रस्टींच्या विरोधातील याचिकेची सूनावणी चालू आहे.
तारापूर इथे वास्तव्यास असणाऱ्या ६० वर्षीय तारापोरवाला यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपण पंचायतीचे घरकुल मिळवण्यासाठी गरीब आणि पात्र असल्याचा दावा केला आहे. अंधेरी येथील पंथकी बागमध्ये पंचायतीने आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींना फ्लॅट दिले असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. आपण आणि आपल्या पत्नीच्या आजारापणामुळे वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत वास्तव्य करणं आवश्यक असल्याचं तारापोरवाला यांचे म्हणणं आहे.
तारापोरवाला यांची याचिका सूनावणीसाठी आली असताना पारसी पंचायतीचे पर्सी गांधी यांनी तारापोरवाला गरीब नसल्याचं आणि केवळ त्यांना पंथकी बागेत फ्लॅट दिला नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली असं म्हणणं मांडलं. तारापोरवाला श्रीमंत असून त्यांच्याकडे कितीतरी एकर जमीन आहे आणि हे फ्लॅट गरजू आणि गरीबांसाठी असल्याचं पंचायतीच्या वकिलांनी सांगितलं.
त्यावेळेस न्यायाधिशांनी विचारलं की गरीब असण्याचा निकष काय? ज्या व्यक्तीचे उत्पन्न महिन्याला पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे तो गरीब असल्याचं पंचायतीच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर आजवर आमच्या पाहण्यात कोणीही गरीब पारसी नसल्याचं न्यायाधिश मजुमदार म्हणाले.