गोत्यात आणतात ती नातीगोती - बाळासाहेब

आज शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये मुलाखतीच्या तिसऱ्या भागात बाळासाहेब ठाकरे यांनी पुतणेशाहीचा जोर वाढल्याची टीका केली आहे. जी नाती गोत्यात आणतात ती नातीगोती.

Updated: Jan 10, 2012, 01:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र काढले आणि राजकिय घडामोडीचे नवनवे अंदाज बांधले जाऊ लागले, त्यामुळे आज शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये मुलाखतीच्या तिसऱ्या भागात बाळासाहेब ठाकरे यांनी पुतणेशाहीचा जोर वाढल्याची टीका केली आहे.

 

जी नाती गोत्यात आणतात ती नातीगोती. या नातेवाईकांचे कर्तृत्व ‘शून्य’ असते, पण सत्तेवर आणि पदावर बसलेली व्यक्ती जवळची नातेवाईक असल्याने त्यांचा पुरेपूर फायदा उठवला जातो. नात्यांचा वापर स्वार्थासाठी होतो.

 

महाराष्ट्राच्या भागाला ‘कानडी’त घुसवल्यामुळे तेथील मराठी माणसांचे हाल सुरू आहेत. त्या मराठी माणसांना तुम्ही हे वाकडेतिकडे संदेश कसे देऊ शकता तुम्ही कानडी शिका म्हणून. हा सीमा भाग मुळात कर्नाटकाचा नाहीच आहे. आपल्या महाराष्ट्राचा भाग तिकडे गेला आहे. त्यातले जे मराठी आहेत त्यांना कानडी शिकण्याचे सल्ले कसले देता? ज्यांना सीमा प्रश्‍न काय आहे ते समजलंच नाही तेच असा बकवास करताहेत. आमच्या वडिलांना मी ‘दादा’ हाक मारीत होतो. आमचा एकच ‘दादा’ सगळ्यांना पुरून उरलाय. उरेल. अजूनही ते विचारानं आणि कर्तृत्वानं जिवंत आहेत. जागे आहेत. एकच दादा, ठाकरे दादा! आमच्या दादांनी इतर भानगडी केल्या नाहीत, तर फक्त समाजकार्य केलं. हे फक्त ‘माजकार्य’ करताहेत. ईर्षेमुळेच राजकारणात पुतणेशाहीचा जोर वाढल्याची टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. सामनाच्या विशेष मुलाखतीमधून गेल्या काही दिवसांत पुतण्यांनी केलेल्या बंडाचा शिवसेनाप्रमुखांनी समाचार घेतला आहे.