कफ परेडला अपार्टमेंट १,११,००० रु चौरसफूटला

कफ परेडच्या जॉली मेकर 1 या भारतातील सर्वात श्रीमंत सोसायटीतील अपार्टमेंटचा व्यवहार एक लाख ११ हजार रुपये स्क्वेअर फूट या दराने झाला.

Updated: Feb 8, 2012, 03:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 
कफ परेडच्या जॉली मेकर 1 या भारतातील सर्वात श्रीमंत सोसायटीतील अपार्टमेंटचा व्यवहार एक लाख ११ हजार रुपये स्क्वेअर फूट या दराने झाला. जॉली मेकरमधील २१व्या मजल्यावरील २५९० स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेल्या अपार्टमेंटसाठी तब्बल २९ कोटी रुपये खरेदीदाराने मोजले आहेत. आजवर देशातील हे सर्वाधिक किंमतीचे डील आहे.

 

आतापर्यंत वरळीच्या समुद्र महलमधील १९ व्या मजल्यावरील ड्युप्लेक्स २०१० साली एक लाख दोन हजार रुपयांना विकण्यात आला होता. त्यावेळेस ३७,२५ कोटी रुपयांना खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता. जॉली मेकरमधील चार बेडरुम अपार्टमेंट आणि दोन कार पार्किंगच्या जागा जगवानी कुटुंबाने पटणी कम्प्युटर्सच्या अशोक पटणींना विकलं. अशोक पटणींच्या पत्नी साधना पटणी यांच्या नावाने हा फ्लॅट रजिस्टर्ड करण्यात आला आहे.

 

नरेंद्र, अशोक आणि गजेंद्र या तीन भावांचे या टॉवरमध्ये अपार्टमेंटस आहेत. जगदीश जगवानी यांनी हा व्यवहार झाल्याचं मान्य केलं पण अधिक बोलण्यास नकार दिला. सोसायटीचे सेक्रेटरी महेश लालवानी आणि अशोक पटणींचा मुलगा अपूर्व पटणी यांनी देखील या व्यवहारासंबंधी बोलण्यास नकार दिला. मार्केटमध्ये मंदी असताना देखील या एका मोठ्या व्यवहाराने थोडासा उत्साह निर्माण केला.
यापूर्वीचा मोठा व्यवहार अडीच वर्षापूर्वी झाला होता. त्यावेळेस नरीमन पॉईंटच्या एनसीपीए अपार्टमेंट्समधील ३४७५ फ्लॅटचा प्रती स्क्वेअर फूट ९७,८४२ रुपयांना लंडनमधील एका अनिवासी भारतीयाने विकत घेतला होता.

 

जॉली मेकर 1 मध्ये १७५ अपार्टमेंटस आणि १० बंगलोज आहेत. भारतातील आघाडीचे उद्योगपतींची निवासस्थाने जॉली मेकरमध्ये आहेत. त्यात झीचे सुभाष चंद्र, गोयंका, पटणी कुटुंब, गोव्याचे साळगावकर कुटुंब, बांधकाम क्षेत्रातील नामांकित डॉ.ए.एस.मेकर आणि संयुक्त अरब अमिरातीची वकिलात यांचा समावेश आहे.

 

भारतातील सर्वात श्रीमंत सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉली मेकरकडे ३० कोटी रुपयांचा राखीव निधी जमा आहे. या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सभासदांना मेंटनेन्स तर द्यावा लागतच नाही उलट वर्षाला सहा ते बारा लाख रुपयांचा लाभांश मिळतो.