www.24taas.com, मुंबई
सहकारातील दिपस्तंभ असं ज्या सारस्वत बॅकेचे सार्थ वर्णन केलं जातं त्याचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना कोंकणी दिग्गज पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटकातील नामांकित मणीपाल शिक्षण संकुलातील डॉ.टी.एम.ए.पै.विश्वस्त संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो.
एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बॅकेने जवळपास तीस हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. देशात प्रथम क्रमांकाची सहकारी बँक असा लौकिक सारस्वतने प्राप्त केला आहे. संपूर्ण देशात कुठेही व्यवसाय करण्याचा पॅन इंडिया लायसन्स सर्वप्रथम सारस्वत बँकेला रिझर्व्ह बँकेने दिले आहे.
एकनाथ ठाकूर यांना ३१ मार्चला मणिपाल येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ठाकूर यांच्या बरोबरीने कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री आर.व्ही.देशपांडे आणि कर्नाटकचे विधानसभेचे उपाध्यक्ष एन.योगेश भट यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याआधी डॉ.अनिल काकोडकर, जॉर्ज फर्नांडिस, किशोरी आमोणकर, सुमन कल्याणपूर, गिरीश कर्नाड, आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.