डोंबिवली: 'झी 24 तास'च्या बातमीनंतर अखेर पोलीस प्रशासनाला जाग आलीय. डोंबिवलीच्या डान्स बारमध्ये नाचकाम करणाऱ्या दोघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलंय. संजय बाबर आणि रशीद मुलानी अशी या दोघा निलंबन झालेल्या पोलिसांची नावं आहेत.
त्यांच्याविरूद्ध खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आलीय, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिलीय. झी मीडियानं सकाळपासूनच या बातमीचा जोरदार पाठपुरावा केला होता.
बारबालेच्या छमछमवर पीरतीचा इंचू चावून घायाळ झालेला सर्वसामान्य नाहीतर एक पोलीस कॉन्स्टेबल चक्क डांस करतोय. मानपाडा पोलीस स्टेशनचे रशीद मुलानी आणि संजय बाबर हे कॉन्स्टेबल कल्याण शीळ रस्त्यावरच्या इन्द्रप्रस्थ बारमध्ये बारबालेच्या तालावर धुंद झाले. या दोन कॉ़न्स्टेबलच्या या चाळ्यांची क्लिप झी मीडियाच्या हाती लागलीय.
राज्यात डान्सबार बंदी आहे. मात्र कल्याण शीळ रस्त्यावरच्या इन्द्रप्रस्थ बारमध्ये खुलेआम बारबाला थिरकत असल्याचं या व्हीडिओवरून उघड होतंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी हे प्रकार रोखायचे ते पोलिसच इथे खुलेआम बेधुंद होऊन नाचतायत. मानपाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा डान्सबार सुरू आहे. इथं सर्रास बारबालांची छमछम सुरू आहे. मात्र डोळ्यावर धुंदी चढलेल्या पोलिसांना हे डान्सबार दिसत नाहीयेत की काय अशी स्थिती आहे.
मुलाणी आणि संजय बाबर हे दोन कॉ़न्स्टेबल या बारमध्ये नेहमीच जात असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे. ही क्लीप पाच दिवसांपूर्वीची आहे. त्यात या पोलिसांच्या रासलीलेचा पर्दाफाश झालाय.
कल्याण डोंबिवलीची जनता वाढत्या गुन्हेगारीनं त्रस्त असताना पोलीस मात्र छमछममध्ये गुंतले आहेत. यानिमित्तानं झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले आहेत.
झी 24 तासचे सवाल
डोंबिवली कल्याण परिसरात रोज घरफोड्या होतायत, दिवसाढवळ्या मंगळसूत्र खेचली जातायत, नागरिक भयभित आहेत. मात्र सरकारी यंत्रणा पूर्णपणे हतबल झाल्याचं चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे कर्मचारीही असेच नर्तिकेवर पैसे उधळताना आम्ही दाखवले होते. आता मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीसच डान्सबारमध्ये मर्दुमकी गाजवत असल्याचा प्रकार चीड आणणारा आहे... डोंबिवलीचे रक्षणकर्तेच असे छमछमच्या तालावर नाचत असतील तर कायदा सुव्यवस्थचे धिंडवडे निघणार नाहीत तर काय होणार?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.