नागपूर: देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं पूर्णकालीन अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. त्यांच्याच बालेकिल्ल्यात, नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाची हवा मात्र तापल्याचं दिसतंय.
या अधिवेशनात सरकारला दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रमुख प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. विरोधी पक्षातून एकदम सत्ताधारी झालेली शिवसेना कमी महत्त्वाच्या खात्यांमुळं नाराज आहे. शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी असताना त्या खात्याचं राज्यमंत्रीपदही नाकारण्यात आलंय. इतक्या कमी वेळेत दोन्ही पक्षांची दुखावलेली मनं जुळतील, अशी शक्यता नाही. त्यामुळं शिवसेनेला चुचकारून सरकारची बाजू सभागृहांमध्ये मांडण्याची कसरत फडणवीस यांना करायची आहे.
दुसरीकडे विरोधकांमध्येही आलबेल नाही, असंच दिसतंय. विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संषर्घ पेटण्याची चिन्हं आहेत. या पक्षांमध्येच एकजूट नसल्यामुळं सरकारला धारेवर धरलं जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं फडणवीस सरकारला हे अधिवेशन काहीसं सोपं जाईल, असं मानलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.