जळगावचा 'जयकांत शिखरे' कोण?

सिंघम सिनेमात एक संवाद आहे, जयकांत शिखरे का 'इगो कभी हर्ट नही करने का?' जळगावातील पोलीस अधिकारी अशोक सदरे यांनी नेमका कुणाचा 'इगो हर्ट केला होता, की त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली?

Updated: Oct 21, 2015, 12:51 PM IST
जळगावचा 'जयकांत शिखरे' कोण? title=

मुंबई : सिंघम सिनेमात एक संवाद आहे, जयकांत शिखरे का 'इगो कभी हर्ट नही करने का?' जळगावातील पोलीस अधिकारी अशोक सदरे यांनी नेमका कुणाचा 'इगो हर्ट केला होता, की त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली?

सदरे यांच्या विरोधात जलद गुन्हा दाखल झाला
वाळू माफिया सर्रास कायद्याचं उल्लंघन करून वाळू उपसा करतात, म्हणूनच त्यांना वाळू माफिया म्हटलं जातं, पण वाळू माफियाची तक्रार सर्वात जलद, तो गुन्हा देखील पोलिस अधिकाऱ्याविरोधात दाखल झाला, यामागे कोणता 'जयकांत शिखरे' आहे?. कारण पोलीसांकडून पोलिस अधिकाऱ्यांविरोधातच एवढे तप्तर गुन्हे दाखल होणे हे ऐतिहासिक म्हणावे लागेल.

पोलिस दलात एक शस्त्र सत्य बोलणाऱ्याविरोधात, किंवा मनासारखं काम करून घेण्यासाठी, वाटेत आडवं येणाऱ्याविरोधात वापरलं जातं, तेच शस्त्र अशोक सादरे यांच्याविरोधात वापरलं गेल्याचा संशय त्याच्या आत्महत्येनंतर बळावतोय.

अख्खा जिल्हा 'जयकांत शिखरे'चा इगो सांभाळतो
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या पोलिस स्टेशनलाही जयकांत शिखरेचे पीआयना फोन जातात, यामुळे पोलिसांच्या कामात मोठी ढवळा-ढवळ होते.

अगदी हाणामाऱ्यांची राजकीय प्रकरणं असतील तरीही जयकांत शिखरेचा 'इगो' पोलिसांना सांभाळावा लागतो. तालुक्यावरचे काही पोलिस अधिकारी (पीआय) हा इगो सहज झेलतात, अगदी फुलासारखा...! 

गिरणा, तापी वाळू उपसामुळे सोनेरी दिवस
कारण गिरणा आणि तापीनदीतील सोन्यासारख्या वाळूने त्यांच्या जीवनात सोनेरी दिवस आलेले आहेत. याच जोरावर की काय काहींनी नाशिक सारख्या कूल सिटीत सोनेरी माया जमवली आहे. या सोनेरी मायेच्या प्रेमात असल्याने, त्यांनाही जयकांत शिखरेचा इगो दुखवायचा नाहीय.

जळगावच्या स्मशानातलं सोनं
पण, स्मशानातं सोनं या कथेत मृतदेहाच्या तोंडातून सोनं काढतांना भिमाचा हात जबड्यात अडकतो, त्याप्रमाणे अशोक सदरे प्रकरणामुळे, तापी आणि गिरणा नदीतलं वाळूचं हे सोनं काढतांना, वाळूशी संबंधित पोलिस, महसूल, माफिया आणि राजकारण्यांचा हात, बेसुमार वाळू तस्करीमुळे, मृतावस्थेत आलेल्या गिरणा आणि तापी नदीच्या जबड्यात अडकलाय, फसलाय. तरीही त्यांच्यासाठी शिखरेचा इगो अजुनही महत्वाचा आहे, कारण शिखरेचा इगो सोनेरी कमाईमुळे काही अधिकाऱ्यांनाही हवा-हवासा वाटतोय, मात्र वाट आत्महत्या करावी लागतेय, त्याविरोधात बोलणाऱ्या अशोक सदरे सारख्या अधिकाऱ्यांची.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.