वाशीम: बिहारमधील दशरथ मांझी यांची आठवण करुन देणारी घटना वाशीममध्ये घडली आहे. शेजा-याने पत्नीला पाणी देण्यास नकार दिल्यानं उदविग्न झालेल्या शेतमजुरानं दीड महिना रखरखत्या उन्हात पत्नीसाठी विहीर खोदली.
विशेष म्हणजे दुष्काळात नैसर्गिक स्त्रोत आटत असताना अवघ्या 15 फूटावर त्याला पाणी लागलं. या शेतमजूराचं नाव आहे बापूराव ताजणे. पाणीटंचाईमुळे ताजणे यांच्या पत्नीनं शेजा-याकडे पाण्याची मागणी केली होती, पण शेजा-यानं त्यास नकार दिला.
हा नकार जिव्हारी लागलेल्या बापूराव ताजणे यांनी कायमस्वरुपी उपाय म्हणून स्वतः विहीर खोदण्याचा निर्धार केला. विहीर खोदण्याचं कोणतंही तंत्र माहित नसताना आणि हाती पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध नसतानाही त्यांनी या कामाला सुरुवात केली.
बापूराव यांनी सुरु केलेल्या खोदकामाची गावक-यांनीच नव्हे तर नातेवाईकांनीही टिंगल केली. पण ते विचलित झाले नाहीत आणि ध्येयवेडे बापूराव ताजणे विहीर खोदूनच थांबले. आता ताजणे यांनी खोदलेल्या विहीरीमुळे त्यांचीच नाही तर सा-या गावाची तहान भागत आहे.