गजानन देशमुख, हिंगोली : आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठवलाची मानाची पूजा करण्याचा मान, यंदा हिंगोलीतल्या धांडे दाम्पत्याला मिळाला. तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी करणारं धांडे दाम्पत्य विठ्ठलाप्रती नुसतं श्रद्धाळूच नाही, तर कष्टाळू, मेहेनती आणि आदर्श असंच वारकरी दाम्पत्य आहे.
आषाढी एकादशीला लाडक्या पांडुरंगाची मानाची पूजा करण्याचा मान मिळाल्याबद्दल, हिंगोली जिह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी खुर्दच्या राघोजी धांडे आणि संगीता धांडे या दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वतःसाठी काहीही मागण्याऐवजी, महाराष्ट्रावर पडलेलं दुष्काळाचं संकट दूर कर बा विठुराया, असंच साकडं त्यांनी पांडुरंगाला आषाढी एकादशीला घातलं. एका व्यापाऱ्याकडे मुनीम म्हणून काम करणाऱ्या राघोजी धांडे यांनी पत्नी संगीता यांच्यासोबतीनं १९९९ या वर्षी पहिल्यांदा पायी वारी केली. आणि गेली १६ वर्षं आषाढीची वारी तिही अनवाणी हा त्यांचा नित्यक्रमच ठरला.
दरम्यान त्यांनी बाळापूर इथे दुसऱ्या एका सहकाऱ्यासोबत माउलीच्या नावानंच सिमेंट गजाळी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मेहेनतीच्या बळावर आज त्या एका दुकानाची दोन दुकानं झाली आहेत. तर वडिलोपार्जीत तीन एकर खडकाळ जमिनीवरही स्वकष्टानं त्यांनी सोनं पिकवलं. विठुरायाची सेवा सदोदित घडावी यासाठी त्यांनी पिंपरी पाटी इथे विठ्ठल रुखमाईच्या मंदिरासाठी जागाही दिली.
श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नसावी, सोबत कष्ट उपसण्यासाठी सदैव तत्पर राहावं, हेच राघोजी धांडे यांचं तत्व आहे. सावळ्या विठुरायानं आपल्याला भरभरुन दिलं. हेच देणं समाजासाठी उपयोगी यावं, सोबतच पांडुरंग सदैव स्मरणात राहावा, एवढीच इच्छा राघोजी आणि सुनीता धांडे दाम्पत्य बाळगून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.