ठाणे : ठाण्यात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडाच्या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं... यातंच, या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका व्हिडिओ जर्नलिस्टचं हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय.
झी मीडियाचे माजी व्हिडिओ रजर्नलिस्ट रतन राधेश्याम भौमिक यांचं वयाच्या अवघ्या ३१ वर्षी निधन झालंय. रतन भौमिक हे सध्या 'आज तक' या चॅनलमध्ये कार्यरत होते.
कासार वडवली हत्याकांडाच्या कव्हरेज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पीटलमध्ये रतन भौमिक दाखल झाले होते. याचवेळी, सकाळी जवळपास ८.४५ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला.
सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवलं. उपचारांसाठी ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये हलवण्याची तयारीदेखील करण्यात आली परंतु, त्यापूर्वीच भौमिक यांनी अखेरचा श्वास घेतला.
याआधीही हृदयविकाराचा धक्का जाणवल्यानं रतन भौमिक यांच्यावर दीडवर्षापूर्वी एन्जीओप्लास्टी झाली होती.
भौमिक अविवाहीत होते... त्यांच्यामागे आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.