'सैराट' जोडप्याचे पोलिसांच्या मदतीने शुभमंगल

कुटुंबियांचा विरोध झुगारून पळून जाणाऱ्या प्रेमी युगुलाला उदगीर पोलिसांनी अटक केली होती. परंतु सैराटच्या आर्ची-परश्याप्रमाणे या दोघांना वेगळं करणंही कोणालाच शक्य झालं नाही.

Updated: Aug 5, 2016, 07:36 PM IST
'सैराट' जोडप्याचे पोलिसांच्या मदतीने शुभमंगल  title=

उदगीर : कुटुंबियांचा विरोध झुगारून पळून जाणाऱ्या प्रेमी युगुलाला उदगीर पोलिसांनी अटक केली होती. परंतु सैराटच्या आर्ची-परश्याप्रमाणे या दोघांना वेगळं करणंही कोणालाच शक्य झालं नाही.

अमोल बच्चनसिंह पडवाळ हा उदगीरच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात बी़टेक़चे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयातील कर्मचारी प्रेमसिंग राठोड  यांच्याशी अमोलच्या वडिलांची ओळख होती. त्यामुळे राठोड यांच्या घरी अमोलचे येणे-जाणे होते. तेव्हाच राठोड यांच्या मुलीशी त्याची ओळख झाली. पुढे दोघेही प्रेमात पडले. अमोलने ही गोष्ट आपल्या घरी सांगितली. परंतु घरच्यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे अमोलने प्रेयसी शारदा राठोड हिला घेऊन थेट इंदौर गाठले.

शारदाच्या कुटुंबियांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी दोघांचाही शोध घेतला. मात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अमोल आणि शारदाने माघार घेणे शक्य नव्हते. म्हणून मग पोलिसांनीच पुढाकार घेऊन दोघांच्याही कुटुंबियांची मनधरणी केली. दोघेही सज्ञान असल्याने त्यांचे आज सकाळी 11 वाजता ठाण्यातच लग्न लावून देण्यात आले.