लातूर : लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय.
यात ७० वर्षीय शिवाजी गोपाळ वाघे, त्यांची पत्नी वर्षीय केराबाई आणि २७ वर्षीय मुलगा हनुमंत वाघे यांचा समावेश आहे.
जवळगा येथे आपल्या नातेवाईकांसोबत शिवाजी वाघे यांचा जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. यात रेणापूर पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत वाघे कुटुंबियांनी विष प्राशन केलं.
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारातच हा प्रकार झाल्यामुळे उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. यानंतर या तिघांनाही पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय.
जमिनीच्या वादावरून वाघे कुटुंबीयांवरही पोलिसात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान वाघे कुटुंबीयांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय.