औरंगाबाद : शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट सरकारने चालवला असून विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांची बळजबरीने जमीन घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या वरुड काझी परिसरात मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मेधा पाटकर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून त्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात असून, एकप्रकारे शेतीची हत्या केली जात असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलंय. समृद्धी कुणाची आणि बर्बादी कुणाची, हे आता शेतकऱ्यांना कळून चुकले असून त्याविरोधात शेतकरी खंबीरपणे लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असल्याचं पाटकर यांनी सांगितलं.
पर्यावरणीय सुनावणीपूर्वी सगळ्या परिणामांचे अभ्यास शेतकऱ्यांसमोर आले पाहिजे. सुनावणी प्रकल्पग्रस्त ठिकाणी झाली पाहिजे. नियोजनाची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने झाली नाही, याचा विचार सरकारने करावा, असं देखील मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर राज्याचे कृषीमंत्री विदेश दौऱ्यावर असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दात टीका केली.