पुणे : पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरीत लवादाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुण्यातील पर्यावरणप्रेमीनी केलेल्या याचिकेवर एनजीटीनं हा आदेश दिला आहे.
मेट्रो प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरापूर्वीच भूमिपूजन झालंय. मेट्रोच्या टप्पा एकमधील वनाज ते रामवाडी मार्गाचा काही भाग हा नदीच्या कडेनं प्रस्तावित आहे. मात्र तसं झाल्यास नदीच्या पर्यावरणाला धोका पोचणार असल्याचा दावा पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर, आरती किर्लोस्कर तसंच खासदार अनु आगा यांनी केलाय.
या सगळ्यांनी त्यासाठी एनजीटीमध्ये धाव घेतलीय. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान मेट्रोच्या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. या प्रकरणात महाराष्ट्र मेट्रो कंपनीला प्रतिवादी करण्याचा आदेशही एनजीटीनं दिलाय.